Monday, 18 December 2017


१९ नोव्हेंबर २०१७
नाकींदा टोक चा थरारक प्रवास
आजचा रायरेश्वर ते नाकींदा ट्रेक खूपच अवघड होता.
शारीरिक आणि मानसिक कसोटी लागली.
जवळजवळ ३०-३२ किलोमीटर अंतर सह्याद्रीच्या कडा-कपाऱ्यांतून दऱ्या-खोऱ्यांतून पार करून रायरेश्वर ते नाकींदा आणि नाकींदा ते रायरेश्वर ही या किल्ल्याची विभिन्न टोके पार करून ही मोहीम पूर्ण केली.
रायरेश्वर किल्ल्यावर आपण सर्वजण फक्त शंभू महादेव मंदीरच पाहतो आणि निघून जातो.
पण आपणाला हे माहिती नाही की, रायरेश्वर किल्ल्याचा संपूर्ण घेरा हा ४८ किलोमीटर आहे.
आमची आजच्या या मोहीमेसाठी ३५ जणांची टिम सज्ज झाली.
आमच्या टीमचे लीडर आमचे मार्गदर्शक प्रशांत (दादा) डोंगरे हे करत होते. त्यांची ही ७ वी मोहिम होती.
या आमच्या मोहीमेमध्ये सातारा मधील प्रसिद्ध सह्याद्री ट्रेकर्स चे ४ सदस्य सामील झाले.
रायरेश्वर ते नाकींदा हे अंतर १५ किलोमीटर आहे.
प्रथमतः सकाळ सकाळी शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन ट्रेकसाठी प्रारंभ केला.
अत्यंत अवघड वाटा, तसेच मधेच लागणारे जंगल, डोंगराचे चढ-उतार, विस्तृत पठार, कातळ कड्याच्या बाजूची चिंचोळी वाट, वन्यजीव प्राण्यांचे दर्शन असे सह्याद्रीचे नैसर्गिक भौगोलिक रूप अनुभवत आम्ही ४ तासांत नाकींदा टोकाजवळ पोहोचलो.
त्यावेळेस कळलं नाकींदा म्हणजे काय ?
आपण १५ किलोमीटर का चालत आलो ते ?
सह्याद्री काय आहे ते आयुष्यात पहील्यांदा कळलं !
नाकींदा ची दरी म्हणजे नजर जाईल इतकी खोल.
महाबळेश्वरच्या आँरर्थरसीट पाँईंट पेक्षा पण खोल.
काळजाच थरकाप होईल आणि अंगाच पाणी-पाणी होईल अस सह्याद्रीच कणखर रूप मी पहिल्यांदाच पाहिलं.
म्हणतात ना हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो.
त्याची प्रचिती मला तेव्हा आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सह्याद्रीतून आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केले.
आपलं भाग्य आहे की आपण या सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलो.
या किल्ल्यावरून आपल्याला पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोळेश्वर पठार, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर दिसतो.
खूप चालून चालून आम्ही दमलो होतो.
नाकींद्यावरच जेवण करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो.
डोळ्यांत पुन्हा एकदा नाकींदा टोक आणि त्याची दरी साठवून आम्ही रायरेश्वराकडे पुन्हा निघालो.
३ तासांची पायपीट केल्यानंतर आम्ही शंभूमहादेवाच्या मंदीराजवळ येऊन पोहोचलो.
थोडावेळ तिथे विश्रांती घेतली गावरान ताक पिऊन घराकडे निघण्यास मार्गस्थ झालो.
३० किलोमीटर अंतर चालून पाय आता हळूहळू पडत होते.
सुर्यास्त होताच आमच्या गाडीने वाईकडे प्रस्थान केले.
खरतर आपण सुध्दा कधीतरी एखाद्या सुट्टी दिवशी रायरेश्वर पहावा
कारण की,
या पठारा वरील रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे.



हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला येथेच स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यामुळे या मंदिराला मराठी रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.
(टीप- नाकींदा टोक ज्यांना पहायचय त्यांनी अनुभव असलेल्या वाटाड्यांकडून पहावे.)
🙏🏻लेख-रोहित शिवाजी मुंगसे🙏🏻
⛰भटकंती सह्याद्रीची⛺